Saturday, July 21, 2007

शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफ्टवेअर

संकेतस्थळाचीही निर्मिती
मुंबई : महाविद्यालयांचा निष्काळजीपणा, सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बेफिकीरी, नियमांमधील किचकटपणा, निधीचा होणारा गैरवापर, अशा अनंत अडचणींमुळे गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शुल्कमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. आता या अडचणींवर रामबाण उपाय शोधून सामाजिक न्याय विभागाने विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची माहिती मिळावी म्हणून खास संकेतस्थळही सुरू करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरची माहिती मुंबईतील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यासाठी खास मुंबई विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले, प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत, "बीसीयूडी'चे संचालक डॉ. व्ही. एन. मगरे, मुंबई उपनगरचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यशवंतराव मोरे, मुंबई शहरचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी पेडणेकर व ठाण्याचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी रतन बनसोडे आदी उपस्थित होते. सुमारे 400 महाविद्यालयांतील प्राचार्य व प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. सामाजिक न्याय विभागाने विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरचे नाव "ccf - 2007' असे आहे; तर संकेतस्थळाचे नाव www.goischolarship.gov.in असे आहे. "सीसीएफ' सॉफ्टवेअर प्रत्येक महाविद्यालयात व संबंधित विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यान्वित केले जाईल. महाविद्यालयाने लाभार्थी विद्यार्थ्याचा सॉफ्टवेअरमधील अर्ज भरल्यानंतर "सॉफ्टवेअर' स्वत:हूनच त्या विद्यार्थ्याच्या शुल्कमाफीचा व शिष्यवृत्तीचा निधी, त्याला प्रत्येक महिन्यासाठी मिळणारा निर्वाह भत्ता याची तपशीलवार माहिती देईल. ही सर्व माहिती ऑनलाईनद्वारे संबंधित विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे प्राप्त होईल. समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यावर मंजुरीची प्रक्रिया केली जाईल. समाजकल्याण अधिकाऱ्यांचे "सॉफ्टवेअर' थेट वेबसाईटलाच जोडलेले असेल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपली शिष्यवृत्ती व शुल्कमाफीची स्थिती संकेतस्थळावर पाहायला मिळेल. विशेष म्हणजे संकेतस्थळामुळे महाविद्यालयाला व समाजकल्याण विभागालाही निष्काळजी राहता येणार नाही. मंजुरीची संपूर्ण प्रक्रियाच ऑनलाईन दिसू शकणार असल्याने महाविद्यालयाचा अथवा समाजकल्याण विभागाचा दोषही विद्यार्थ्याला सहजपणे दाखविता येणार असल्याची माहिती यशवंतराव मोरे यांनी या वेळी दिली.या सॉफ्टवेअरचा प्रयोग आता सर्वप्रथम मुंबई उपनगरमध्ये सुरू करण्यात आला आहे. संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने ते महिनाभरात सर्वांना दिसू शकेल, असे यशवंतराव मोरे यांनी सांगितले. राज्यातील इतर कोणताही विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी या सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थ्यांना इंटरनेटवरून माहिती उपलब्ध करू शकेल, अशीही सुविधा आम्ही निर्माण केली असल्याचे मोरे म्हणाले.

No comments: