Sunday, March 1, 2009

आजारी शिक्षकांची शिक्षण मंडळाला डोकेदुखी

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. परंतु, अनेक शिक्षकांनी आजारी असल्याचे कारण देत उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामातून सूट देण्याची विनंती करणारे अर्ज शिक्षण मंडळाकडे धाडले आहेत. शिक्षण मंडळाच्या वाशी कार्यालयात दररोज पंधरा ते वीस शिक्षकांची अशी प्रकरणे येऊ लागल्यामुळे मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक कुठून उपलब्ध करायचे, असा यक्ष प्रश्न आता मंडळाच्या अधिका-यांसमोर उभा राहिला आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम टाळण्यासाठी शिक्षकांकडून आजाराची खोटी कारणे दिली जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आजारांच्या फायलींचा ढिग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिक्षकांकडून सादर होणाऱ्या या फायलींमध्ये डॉक्टरांच्या कागदपत्रांव्यतिरिक्त लोकप्रतिनिधींच्या विनंतीपत्रांचाही समावेश आहे. विशिष्ट शिक्षकाला उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात सूट देण्याची विनंती लोकप्रतिनिधींच्या या पत्रांमध्ये करण्यात आलेली आहे. काही प्रकरणे वगळता बहुतेक शिक्षकांनी आजाराची खोटी कागदपत्रे सादर केली असल्याची शक्यता मंडळातील एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. बऱ्याच शिक्षकांनी मानेचा अथवा पाठीचा आजार असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. परंतु, वर्षभर ठणठणीत असलेले हे शिक्षक परीक्षेच्या काळातच कसे आजारी पडू लागले आहेत, असा सवाल या अधिकाऱ्यांनी केला आहे.
वास्तविक, शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामासाठी आम्ही योग्य मोबदला देतो. शंभर गुणांची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी साडेपाच ते सहा रुपयांचे मानधन देण्यात येते. शिवाय दिवसातून केवळ २५ उत्तरपत्रिका तपासणे अपेक्षित आहे. या उत्तरपत्रिका शाळेच्या वेळातच तपासायच्या असतात. परंतु, हे महत्त्वाचे कर्तव्य पार पाडण्याची इच्छा काही कामचुकार शिक्षकांमध्ये नसल्याची संतप्त भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांनी परीक्षेच्या कामासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, अशी प्रामाणिक भावना काही शिक्षकांमध्ये नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आजारपणाची खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शिक्षकांची आम्ही तपासणी करण्यार असल्याची तंबीही त्यांनी दिली आहे.