Monday, September 10, 2007

शिक्षणातील आव्हाने आणि संधी

जागतिकीकरणामुळे शिक्षणात प्रचंड बदल होत आहेत. या बदलत्या प्रवाहामुळे अनेक आव्हाने उभी राहीली आहेत तसेच नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना कसे सामारे जायचे, आणि नवीन संधीचा फायदा कसा उठवायचा याचा समस्त भारतीयांना विचार करावा लागणार आहे. या नवीन बदलांना समोरे जात असताना आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच सक्षम झाली आहे का ? याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. एका बाजुला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा संस्था उदयास येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खेडोपाड्यातील मुलांना धड वर्गांची उपलब्धता होत नाही. एक समुह असा आहे की, तो शिक्षणासाठी लाखो रुपये सहजपणे मोजू शकतो; तर दुसरा समुह असा आहे, की ज्याला पोटाचे खळगे भरण्याची भ्रांत पडलेली आहे. अशा परिस्थितीत "शिक्षण क्षेत्रातील आव्हाने' पेलून आपला देश नवीन संधीचा अचुक फायदा उठवू शकेल का ?