Saturday, August 30, 2008

बीएमएमचे वाटोळे

प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये अफाट प्रगती झाली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी कोणाला भविष्यातही या वाटले नसेल की वृत्तपत्र व वृत्तपत्रवाहिन्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. पण हे झालं आहे खरं. प्रसारमाध्यमांची अफाट संख्या वाढल्यामुळे वाचकांना व दर्शकांना बातम्या, नवनवीन माहिती मिळविण्याचे पर्यायही वाढले आहेत. वाचकांच्या बातम्यांची ही भूख भागविण्यासाठी आता वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांना झगडावे लागत आहे. स्पर्धा वाढल्यामुळे प्रसारमाध्यामांनी आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. मिडीया अशा वेगाने फोफावत असतानाच या या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वानवा आहे. त्यामुळे वाचकांना/दर्शकांना दर्जेदार माहिती पुरविताना माध्यमांची दमछाक होत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी आहेत, ही बाब एव्हाना तरूणांच्याही चांगलीच लक्षात आली आहे. त्यामुळेच प्रसारमाध्यमांबद्दल प्रशिक्षण देणाऱया संस्थांकडे तरूणांचे लोंढे वाढू लागले आहेत. पण दुर्दैव म्हणजे, अशा तरूणांसाठी अद्यापर्यंत चांगला अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात विविध शिक्षण संस्थांना अपयश आले आहे. विद्यार्थ्यांना कोणताही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची अधिकृत जबाबदारी विद्यापीठांची आहे. मुंबईमध्ये अर्थातच ही जबाबदारी `मुंबई विद्यापीठा'चीच आहे. ही गरज ओळखून (?) मुंबई विद्यापीठाने २००१ साली `बॅचलर इन मास मिडीया' हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला. जवळपास आठ वर्षापासून हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. तरीही त्याची दुर्दशा न वर्णावी अशी झाली आहे. आजघडीला मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सुमारे ४६ महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. पण `एक ना धड भाराभर चिंद्या' अशीच या अभ्यासक्रमाची स्थिती झाली आहे.
या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने स्थापन केलेल्या `बोर्ड ऑफ स्टडीज'मधील पाच सदस्यांपैकी केवळ एक सदस्य प्रसारमाध्यमांशी संबंधित आहे. उर्वरीत चार सदस्यांचा दुरान्वयेही माध्यम क्षेत्राशी संबंध नाही (अरे बापरे). हे चारही सदस्यांनी चक्क `एमए इन इंग्लिश लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रसारमाध्यमांतील अनुभव तर दुरच ! असे असतानाही या चार सदस्यांची `बोर्ड ऑफ स्टडीज'मध्ये नेमणुक कशी झाली हे नवलच की !
एवढेच नव्हे तर मुंबईतील जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये बीएमएमसाठी `एमए इन इंग्लिश लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. बहुतांशी महाविद्यालयांतील बीएमएमचे विभागप्रमुखही `एमए इन लिटरेचर' हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. प्रसारमाध्यमांचा कसलाही गंध नसताना हे शिक्षक भावी पत्रकार (व जाहीरात क्षेत्रातील तज्ज्ञ) घडवत आहेत. इंटरनेटवरील आयता मजकूर उचलून तो विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचे काम हे शिक्षक करीत आहेत. त्यात विद्यार्थीही `डाऊनलोड तज्ज्ञ' बनले आहेत. दुर्दैवाने महाविद्यालयांनाही याची चिंता नाही. कारण `बीएमएम' म्हणजे महाविद्यालयांसाठी `सोन्याचे अंडे देणारा कोंबडी' ठरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही शिकविले नाही तरी चालेल आपण मात्र `मनी मेकींगचा' व्यवसाय जोरात चालवायचा असे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी पुरेसे संगणक उपलब्ध नाहीत. असलेच तर त्यात आधुनिक सॉफ्टवेअर नाही. ग्रंथालयात संदर्भसाहित्य पुरेसे नाही. स्टुडिओ नाही. कॅमेरे नाहीत. असा सगळा आनंदीआनंद आहे.
गंभीर प्रकार म्हणजे, विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमात पत्रकारीता आणि जाहीरात या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. मुळातच या दोन्ही क्षेत्रामध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा व गरजांमध्ये जमीन-अस्मानमधील फरक आहे. या दोन्ही क्षेत्रातील मुलभूत फरक लक्षात न घेताही बीएमएममध्ये पहिल्या दोन्ही वर्षांमध्ये एकाच वर्गात बसविले जाते. दोन्ही क्षेत्रांच्या तंगड्यात-तंगडी अडकवून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. म्हणूनच तो कुचकामी ठरला आहे.
याबाबत, गेल्या काही दिवसांमध्ये लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकात बीएमएमचे वाभाडे काढणाऱया बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पहा जरा -
http://www.loksatta.com/daily/20080826/mv02.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080827/mv07.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080828/mv07.htm ,
http://www.loksatta.com/daily/20080829/mv07.htm