Sunday, July 5, 2009

द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेतील गैरप्रकाराला अंकुश

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांत जवळपास ५० टक्के विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे दुसऱ्या वर्षांत रिक्त होणाऱ्या जागांवर केंद्रीभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय शासकीय व अनुदानित शिक्षण संस्थाबरोबरच खासगी विनाअनुदानित संस्थांनाही अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे द्वितीय वर्षांतील प्रवेशप्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठीही हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे.
द्वितीय वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत गेल्या शैक्षणिक वर्षांत ‘लोकसत्ता’मध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पदवीच्या द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेतात. याशिवाय प्रथम वर्षांतील बऱ्याच विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून हवे असते अथवा अभ्यासक्रमाची शाखा बदलायची असते. त्यामुळे द्वितीय वर्षांच्या प्रवेशासाठी प्रचंड मागणी असते. परंतु, द्वितीय वर्षांत रिक्त झालेल्या या जागांवर संस्थाचालक मोठी देणगी आकारून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे. एवढेच नव्हे तर या प्रवेशप्रक्रियेसाठी महागडय़ा माहितीपुस्तिका व प्रवेश अर्ज विकून संस्थाचालक गल्ला भरण्याचा उद्योग करायचे. संस्थाचालकांच्या या गल्लाभरू वृत्तीमुळे अनेक गुणवान विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षांत प्रवेश घेणे शक्य होत नव्हते. याउलट गुणवान नसलेल्या परंतु, मोठी देणगी देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळायचा. विशेष म्हणजे, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवीच्या द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून १० टक्के जागांमध्ये (लॅटरल एन्ट्री) वाढ केली जाते. या जागा भरण्यासाठी दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. पण या प्रक्रियेत पहिल्या वर्षांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे द्वितीय वर्षांत रिक्त होणाऱ्या जागांचा समावेश करण्यात येत नव्हता. परंतु, आता लॅटरल एन्ट्रीच्या जागांबरोबरच रिक्त जागांसाठीही एकत्रित केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सर्व अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी द्वितीय वर्षांतील रिक्त जागांची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाला देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जी महाविद्यालये माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा या अधिसूचनेद्वारे देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनीही संस्थास्तरावर द्वितीय वर्षांसाठी प्रवेश घेऊ नयेत. अशा पद्धतीने होणारे सर्व प्रवेश नियमबाह्य ठरविण्यात येणार असल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

No comments: