Sunday, January 6, 2008

केंब्रिज, आयबी बोर्डांना चिंता इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांची

मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये इंटरनॅशनल स्कूल्सची संख्या वेगाने वाढत आहे। या शाळा केवळ धनाढ्य मुलांसाठीच असल्याचे आतापर्यंत चित्र होते. परंतु, गेल्या एक - दोन वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबातील (सर्वसामान्य मराठी) पालकही आपल्या मुलांना अशा इंटरनॅशनल स्कूल्समध्ये पाठवू लागले आहेत. इंटरनॅशनल स्कूल्समधील शिक्षणाचा दर्जा निश्‍चितच चांगला असतो. या स्कूल्समधून जागतिक दर्जाचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी जगाच्या पाठीवर जाऊन कर्तृत्व गाजवू शकतील, असे स्वप्न बाळगून पालकमंडळी अशा स्कूल्सकडे आकर्षित होत असतील तर त्यात वावगे काहीच नाही.

भारतातील बहुतांशी इंटरनॅशनल स्कूल्स केंब्रिज (युनिवर्सिटी ऑफ केंब्रिज इंटरनॅशनल एक्‍झामिनेशन) व आयबी (इंटरनॅशनल बॅकलॉरेट ऑर्गनायझेशन) या आंतरराष्ट्रीय बोर्डांशी संलग्न आहेत। इंटरनॅशनल स्कूल्समधील बारावीची अंतिम परिक्षा या बोर्डांमार्फत घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रही या बोर्डांकडूनच दिले जाते. बारावी उत्तीर्ण केल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी या प्रमाणपत्रांच्या आधारे थेट परदेशात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतात. परंतु, सर्वसामान्य पालकांना परदेशातील शिक्षणाचा खर्च झेपणारा नसतो, त्यामुळे हे पालक आपल्या मुलांना बारावीनंतर भारतीय विद्यापीठांमधील शिक्षणाला प्राधान्य देतात. पण अशा विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना अनेक अडथळे पार करावे लागत असून त्याची चिंता केंब्रिज व आयबी बोर्डांनाही सतावत आहे. या अनुषंगाने केंब्रिज व आयबी बोर्डाने मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव दिनेश कांबळे यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीच्या पात्रतेचे निकष अभ्यासण्यासाठी निमंत्रित केले होते.

इंटरनॅशनल स्कूल्समधील सुमारे साडेचारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यंदा मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतले आहेत। पुढील काही वर्षांत अशा विद्यार्थ्यांची संख्या बरीच वाढणार आहे. या विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देताना कोणते निकष लावायचे याबाबत बरीच संदिग्धता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देताना भारतातील विद्यापीठांचे विशेषत: मुंबई विद्यापीठाचे शंका निरसन करण्याचा हेतू केंब्रिज व आयबी बोर्डाचा होता.इतर विद्यापीठांपेक्षा मुंबई विद्यापीठात इंटरनॅशनल स्कूल्समधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे केंब्रिज व आयबी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केवळ मुंबई विद्यापीठालाच निमंत्रित केले होते, असे कांबळे यांचे म्हणणे आहे. या बोर्डांच्या अधिकाऱ्यांनी प्रेडिक्‍टेड ग्रेड्‌स, एज्युकेशनल प्रोग्राम्स, अभ्यासक्रमाचा दर्जा इत्यादींबाबतच्या सर्व शंकाचे निरसन केल्यामुळे या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता प्रमाणपत्र देताना विद्यापीठाला आता कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे ते म्हणाले.

केंब्रिज व आयबी बोर्डांनी मुंबई विद्यापीठाचे शंकानिरसन केल्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. बरेच पालक आता आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्समध्ये पाठविण्यास बिचकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात इंटरनॅशनल स्कूल्समधील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

No comments: