Tuesday, January 8, 2008

युआयसीटीमध्ये जैविक ऊर्जाशास्त्र केंद्राची स्थापना होणार

केंद्र सरकारकडून 24 कोटींचे अनुदान

जगभरात इंधनाचा कमालीचा तुटवडा भासत आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध देश जैविक इंधानाच्या निर्मितीवर भर देत आहेत. या अनुषंगानेच केंद्र सरकारने "जैविक ऊर्जाशास्त्र केंद्र' स्थापण्याचा निर्णय घेतला असून हे पहिलेच केंद्र माटुंगा येथील युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉजी (युआयसीटी) येथे सुरु होत आहे. या केंद्रासाठी युआयसीटीला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने तब्बल 24 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.
हे केंद्र सुरु करण्यासाठी अन्य पाच संस्थांशी सहकार्य घेण्यात येणार आहे। महिको संशोधन केंद्र, नोवोजिम्स साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, भाभा अणु संशोधन केंद्र आणि अमेरीकेतील पर्ड्यू विद्यापीठाचा रसायन अभियांत्रिकी विभाग तसेच सेंटर फॉर रिझीलियन्स या पाच संस्थांच्या सहकार्याने हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये ऊस व इतर अन्य वनस्पींपासून जैविक इंधनाची निर्मिती केली जाईल. या केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात या केंद्राचा पहिला टप्पा सुरु होऊ शकेल व तीन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने ते काम करेल असे युआयसीटीचे संचालक जे. बी. जोशी यांचे म्हणणे आहे.
संशोधन क्षेत्रात गौरवशाली परंपरा जपलेल्या युआयसीटीमध्ये सुरु होणाऱ्या या नवीन केंद्रामुळे इंधनाची समस्या सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे। सुमारे 20 रुपये प्रतिलिटर दरात हे इंधन उपलब्ध होऊ शकेल. केंद्रामध्ये एका वर्षात साधारण 10 लाख लिटर इंधनाची निर्मिती करता येईल असा जोशी यांनी आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. भारतात प्रती हेक्‍टर सरासरी 100 टन ऊस पिकतो. या एका हेक्‍टरमधील ऊसापासून इंधनाची निर्मिती केल्यास तब्बल 4 लाख रुपये इंधन उत्पादित होऊ शकले.
आपल्याकडे इंधन निर्मितीची क्षमता असलेले सुमारे 20 कोटी टन ऊस व इतर वनस्पती दरवर्षी वाया जाते. तर तब्बल 3 कोटी हेक्‍टर जमीन ओसाड आहे. या ओसाड जमीनीवर इंधन निर्मितीसाठी आवश्‍यक असणाऱ्या वनस्पतींचे उत्पादन करता येईल. एकूणच, जैविक इंधनाच्या निर्मितीमध्ये भारताला मोठी संधी असून त्याचा पुरेपुर वापर केल्यास भारत इंधनात स्वयंपूर्ण होऊ शकेल.

No comments: