Wednesday, September 2, 2009

बीएमएम मराठीचा यशस्वी लढा

बीएमएम मराठीच्या संघर्षात यशप्राप्तीसाठी गेले वर्षभर मराठी अभ्यास केंद्र नेटाने प्रयत्न करत होते. अनेकवेळा यश पदरात पडतेय असे वाटत असतानाच काही कारणाने त्याला हुलकावणी मिळायची. चढ-उतार व तात्कालिक यशापयाशाची मालिका वर्षभर सुरूच होती. पदोपदी येणार्‍या अडथळ्यांना दूर सारताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागायची. बीएमएम मराठी होऊ नये यासाठी आडकाठी आणणारे प्रतिस्पर्धी तुलनेत तुल्यबळ होते. त्यातील काहींच्या शासनदरबारातील वजनापुढे आमच्यासारख्या निव्वळ भाषिकतेच्या नैतिक मुद्द्यावर लढणार्‍यांचा निभाव लागणे कठीणच होते. मात्र आमच्यासोबत या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणार्‍या, आमच्या मागे खंबीरपणे उभे राहून उमेद वाढवणार्‍या व वेळोवेळी आमच्या लढ्याला लोकांपर्यंत पोहोचवणार्‍या अनेकजणांमुळेच अखेर निर्णायक विजय मराठीचा झाला. यात मराठीच्या आग्रहामागील तात्त्विक भूमिका पटलेल्या व त्यासाठी आमच्यासमवेत विद्यापीठाकडे या अभ्यासक्रमासाठी मागणी करणार्‍या ज्येष्ठ पत्रकार व संपादकांचे आम्ही विशेष आभार मानतो. त्यांच्या पुढाकारामुळेच विद्यापीठाला ह्या अभ्यासक्रमाचे महत्त्व पटले व मराठीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली.
ह्या अभ्यासक्रमाच्या मराठीकरणासाठी कुलगुरु डॉ० विजय खोले सुरुवातीपासूनच अनुकूल होते. त्यासाठी विद्यापीठ यंत्रणेला गतिमान करण्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता अभिनंदनीय होती. आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याने सर्व प्रशासकीय अडथळ्यांवर मात करून मा० कुलगुरुंनी मराठीच्या विकासाप्रती दाखवलेली बांधिलकी आदर्श ठरेल. कुलगुरुंच्या सहकार्‍यांनीदेखील कार्यालयीन व्यवहारासाठी सहकार्य करुन प्रक्रिया सुकर करण्यास हातभार लावला.
विविध विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीदेखील या प्रकरणात अन्याय होतो आहे असे वाटत असताना आवाज उठवून पुन्हा पारडे न्यायाच्या बाजूने झुकवण्यासाठी आपली संघटित ताकद वापरली.
मराठीचा आग्रह रास्त आहे अशा भूमिकेतून खा० सुप्रिया सुळे यांनी मराठी बीएमएमच्या मंत्रालयातील मान्यतेच्या प्रवासाला वेग प्राप्त करून दिला. मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यात मराठी बीएमएमची लाल फितीत अडकलेली फाइल त्यांनीच संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन सोडवली. त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य महाराष्ट्रातील भाषाप्रेमी मतदारांना दिलासा देणारे होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री० राजेश टोपे यांनी ह्या अभ्यासक्रमाच्या मान्यतेला शासनाच्या पातळीवर हिरवा कंदिल दाखवला.
सरतेशवटी आपल्या लेखणीच्या जोरावर नेटाने हा मुद्दा वर्षभर लावून धरून मराठी पत्रकारितेच्या अभिवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार्‍या आमच्या सर्व पत्रकार सहकार्‍यांचे व शिक्षण प्रतिनिधींचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. लोकसत्तेच्या तुषार खरात यांनी लोकसत्तेतून इंग्रजी बीएमएमचे वाभाडे काढणारी वृत्तमाला चालवल्यावर या अभ्यासक्रमाच्या मराठीकरणाला चालना मिळाली. त्यानंतर इतर मराठी वृतपत्रांच्या शिक्षण प्रतिनिधींनीदेखील अनेक स्तरांवर या मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा केला. या सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांचे पाठबळ लाभल्यामुळेच मराठीची बाजू ते निर्भिडपणे लोकांपुढे मांडू शकले. याव्यतिरिक्त आमचे हितचिंतक, मित्र व भाषाप्रेमींनी अनेकदा संपर्क साधून याबाबत आपली आस्था व्यक्त करून उमेद वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य केले; त्यांची यादी न संपणारी आहे. मराठी अभ्यास केंद्र या सर्वांचे ऋणी आहे. निव्वळ अभ्यासक्रम सुरु करण्यावरच समाधान न मानता यापुढील टप्प्यात माध्यमांवर दर्जेदार अभ्यास-साहित्य मराठीतून उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मराठीचा विकास अशा लेखन प्रकल्पांतून साकार करुन ज्ञानभाषा म्हणून तिच्या विस्ताराच्या योजना आखण्याची गरज आहे. आपल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच यापुढे हा लढा अधिकाधिक व्यापक करण्याचा आमचा निर्धार जाहीर करुन आपल्या सहकार्याची यापुढील काळातही हमी बाळगतो.
आपले स्नेहांकित,
दीपक पवार राममोहन खानापूरकर
(अध्यक्ष) (कार्यवाह)

मराठी अभ्यास केंद्र

No comments: