Friday, August 24, 2007

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्राचा ठोस कार्यक्रम

अकराव्या पंचवार्षिक योजनेत महत्वकांक्षी उद्दीष्टे

प्राथमिक शिक्षणात भारताची अद्यापही दुरावस्था आहे। ही स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने चंग बांधला असून अकराव्या पंचवार्षिक योजनेत अत्यंत महत्वकांक्षी उद्दीष्टे निश्‍चित करण्यात आली आहेत. या उद्दीष्टांमुळे प्राथमिक शिक्षणात आमुलाग्र बदल घडविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अकराव्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक शिक्षणाचे उद्दीष्ठ ठरविण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विशेष कार्यगटाची नेमणुक केली होती. या कार्यगटाने अत्यंत महत्वपुर्ण शिफारसी केल्या आहेत. केंद्राने 2002 साली घटनादुरुस्ती करुन 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाचा शिक्षण हा "मुलभूत हक्क' असल्याची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रत्येक मुल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अनेक उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या आहेत.सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी "सर्व शिक्षा अभियानाचा' मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे अकराव्या पंचवार्षिक योजनेत "सर्व शिक्षा अभियानाचा' दुसरा टप्पा अधिक सशक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांची कार्यक्षमता, वर्गातील अध्यापन प्रक्रीया आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती याकडे काठेकोरपणे लक्ष दिले जाईल. सर्व शिक्षा अभियानाचा खर्च केंद्र व राज्याने 75:25 या प्रमाणात विभागून घेण्याबाबतही दिलासा देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमण्याऐवजी पुर्णवेळ तज्ज्ञ शिक्षक नेमण्याची ताकीद सर्व राज्यांसाठी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यामध्ये शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे बुद्धीमान व इंग्रजीचे उत्तम ज्ञान असलेला शिक्षक नेमावा असे सुचविण्यास आले आहे. शिक्षकांची किमान 80 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. शाळांतील सोयीसुविधा, शिक्षकांचे अध्यापन कार्य व विद्यार्थ्यांची प्रगती यांची सातत्याने तपासणी करणे आवश्‍यक असून संबंधित राज्य सरकारने त्यासाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्याची सूचना करण्यात आली आहे.अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या मुलांसह भटक्‍या जमाती, स्थलांतरीत, अवजड कामे करणाऱ्या मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समावून घेण्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलींना शाळेत आणणे व त्यांची उपस्थिती ठिकविणे हे एक प्रमुख उद्दीष्ठ केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी यापूर्वी 1200 रुपये खर्च केला जात होता, तो आता 1500 रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण 3 कोटीवरुन 1 कोटीपर्यंत आणण्यात यापूर्वीच यश मिळाले आहे. या मुलांनाही आता शाळाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. सुमारे 6 ते 7 टक्के मुलांना शाळांमध्ये आणणे केवळ अशक्‍य आहे. हे आव्हानही स्विकारायचा निर्धार अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

* प्रमुख उद्दीष्टे

अत्याधुनिक पायाभूत सुविधा वाढविणे
शिक्षकांची कार्यक्षमता, वर्गातील अध्यापन प्रक्रीया आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीवर भर देने
विद्यार्थ्यांची गळती कमी करणे

* पायाभूत सुविधा
शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी फर्निचर पुरविणे
जास्तीत जास्त शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करणे
ग्रंथालये सुरु करणे

* विद्यार्थ्याची प्रगती
चौथ्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची संवाद क्षमता निर्माण करणे
विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन प्रगती तपासणे
कच्च्या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेणे
विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकविणे

* वंचितांनाही शिक्षण
अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे
मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व टिकवून ठेवणे
स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय करणे
भटक्‍या जमातीच्या मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करणे
अल्पसंख्याक मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करणे
रस्त्यावरील, दुकानात काम करणारी व इतर निराधार मुलांसाठी शिक्षण देणे

* भाषा
मातृभाषेतील शिक्षण महत्वाचे, पण इंग्रजीही आवश्‍यक
आदिवासी भागातील अनोळखी भाषा बोलणाऱ्या मुलांसाठी विशेष अध्यापन कौशल्य निश्‍चित करणे

* शिक्षक
प्राथमिक शिक्षणासाठी विद्यार्थी व शिक्षकाचे प्रमाण 40 : 1 असणे आवश्‍यक
उच्च प्राथमिक शिक्षणासाठी विद्यार्थी शिक्षकाचे प्रमाण 30:1 असणे आवश्‍यक
उच्च प्राथमिक शिक्षणासाठी विषयतज्ज्ञ शिक्षक अनिवार्य
शिक्षकांसाठी किमान 80 टक्के उपस्थिती अनिवार्य
एनसीटीईच्या नियमांनुसारच शिक्षकांची भरती आवश्‍यक
शिक्षकांसाठी सतत प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे आवश्‍यक

* तपासणी यंत्रणा
शाळांच्या तपासणीसाठी सक्षम प्रशासन यंत्रणा निर्माण करणे
डायट व केंद्रप्रमुख यांच्यामार्फत पर्यवेक्षण यंत्रणा निर्माण करणे
शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची सतत दखल घेणे
शिक्षकांच्या कामाचे मुल्यमापन करणे

* अभ्यासक्रम
घोकंपट्टी करणारे अभ्यासक्रम टाळाणे
कल्पकता, समस्या समाधान, ज्ञान वृद्धीगंत करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अभ्यासक्रमावर भर

* पालक
पालकांनी सहभाग वाढवून "शिक्षणाच हक्क' बजावावा
मुलांचा अभ्यास तपासण्यासाठी पालकांचे लक्ष आवश्‍यक


1 comment:

Anonymous said...

eh... luv this text :)