Wednesday, January 23, 2008

मराठी पाऊल पडते मागे......!

मुंबई, पुणे आणि जगभरातील तमाम मराठी जनांची मान लाजेने का होईना खाली जायला हवी। मोडेन पण वाकणार नाही हा "स्वाभिमान' जपणाऱ्या मराठीजनांना असे काही वाटण्याची शक्‍यता नाही. शाहू - फुले - आंबेडकरांपासून ते कर्मवीर भाऊराव पाटील - महर्षी कर्वे यांच्यापर्यंतच्या अनेक शिक्षण सुधारकांनी महाराष्ट्राच्या या भूमीत शिक्षणाची गंगा घरोघरी नेहण्यासाठी अपार कष्ट घेतले. तरीही महाराष्ट्र शिक्षणात पिछाडीवर राहवा हा किती मोठा करंटेपणा....!
केंद्र सरकारने नुकताच "शैक्षणिक विकास निर्देशांक' अहवाल जाहीर केला आहे। या अहवालात महाराष्ट्र दहाव्या स्थानावर आहे. केरळने मात्र परंपरेनुसार पहिला क्रमांक पटकावला आहे. पांडिचेरी दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र गेल्या वर्षी बाराव्या स्थानावर होता. यंदा दहाव्या क्रमांकावर आहे, एवढीच काय ती प्रगती (?).
शाळांची उपलब्धता, शैक्षणिक पायाभूत सुविधा, शिक्षकांची पुरेशी संख्या, शाळांचा निकाल यासारख्या 23 बाबी ध्यानी घेवून हा अहवाल तयार करण्यात आला आहे। महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर असल्याचे सतत भासवले जात असले तरी त्यात तथ्य नसल्याचे या अहवालाने उघड केले आहे. महाराष्ट्राची शिक्षणातील स्थिती असमाधानकारक असल्याबद्दल केंद्राने या अगोदरही ताशेरे ओढले आहेत. त्याबद्दलही आम्ही या ब्लॉगवर लिहले होते.
खरेतर, महाराष्ट्रात अत्यंत विरोधाभासाचे चित्र आहे. धनदांडग्यांच्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षण आणि अभ्यासासाठी दिमतीला कॉम्प्युटर असे एका बाजूला चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला आदिवासी व खेडोपाड्यातील मुलांना छत नसलेल्या शाळा, वह्या - पुस्तकांची कमतरता अशा स्थितीत शिकावे लागत आहे. या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. पण त्यासाठी तुम्ही आणि आम्ही कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही...!

No comments: