Tuesday, September 16, 2008

एक वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम


ब्रिटनमधील ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर स्तरावर एक वर्षाचे अभ्यासक्रम (एमए, एमएस्सी, एमकॉम इत्यादी) राबविण्यात येतात. हेच अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविले जातात. चार-पाच महिन्यांपूर्वी मुंबईच्या नगरपाल इंदू शहानी व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या नेतृत्त्वाखाली विविध महाविद्यालयांच्या १३ प्राचार्यांनी ब्रिटनमधील प्रमुख विद्यापीठांना भेट दिली. या भेटीत शिष्टमंडळाला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे इंगीत सापडले. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमावर शिष्टमंडळ भलतेच भलतेच फिदा झाले. एवढेच नाही तर ब्रिटनवरून परतल्याबरोबर या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठातही आता एक वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम राबवावेत, असा कुलगुरूंकडे हट्ट धरला. याच हट्टामुळे आता मुंबई विद्यापीठामध्ये एक वर्ष मुदतीचे अकरा अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होत असताना मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे कोणालाही कौतुक वाटेल, पण खरी गोम पुढेच आहे. या अभ्यासक्रमाचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांना साजेसा असले की नाही, देवजाणे. पण हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाला नक्कीच साजेसा ठरणार आहे. याचे कारण असे की, या प्रस्तावित महत्त्वकांक्षी अभ्यासक्रमांसाठी सव्वा लाख ते पावणेदोन लाख रूपये शुल्क निश्चित केले जाणार आहे. गंमत म्हणजे यातील काही अभ्यासक्रमांची रचना करण्याचे महान कार्य विषयाषाशी संबंधित नसलेल्या तज्ज्ञांनी पार पाडले आहे (उदा. मास कम्युनिकेशन). बरे, या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञ शिक्षक व पायाभूत सुविधा कुठून उपलब्ध करणार, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अभ्यासक्रमांना मंजुरी मिळविण्याची लगीनघाई मात्र मुंबई विद्यापीठाने सुरू केली आहे. म्हणूनच एक वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमांचा दर्जा ब्रिटन, ऑक्सफर्ड विद्यापीठांप्रमाणे नसला तरी मुंबई विद्यापीठाच्या दर्जाप्रमाणे नक्कीच असेल. आपणाला काय वाटते....