Thursday, January 24, 2008

अनिवासी भारतीय दांपत्याचा भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत व्यवसायाभिमुख शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे। अभियांत्रिकी, एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तरूणांना घसघसीत पगाराच्या नोकऱ्या सहजपणे उपलब्ध होत आहेत. किंबहूना व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांची इंडस्ट्रीला कमतरता भासत आहे. त्यामुळे अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. असे असले तरी महागडे व्यावसायिक शिक्षण घेण्याची ऐपत नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. हे गोरगरीब विद्यार्थी नाइलाजाने पारंपरिक शिक्षणासाठी प्रवेश घेतात. अशा गुणवान व गरजू विद्यार्थ्यांना एंटरप्रीनरशिप (उद्योजकताभिमुखता) आणि फायनान्शियल शिक्षण देण्यासाठी हर्ष भार्गव व अरूणा भार्गव या अनिवासी भारतीय दांपत्याने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या दांपत्याने "आय-क्रिएट' या संघटनेची त्यांनी स्थापना केली आहे.
अमेरिकेत व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या हर्ष भार्गव व अरुणा भार्गव या दांपत्याने "आय क्रिएट'ची 2000 मध्ये स्थापना केली होती। पारंपरिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांत रोजगारक्षम शिक्षण देण्याचा "आय- क्रिएट'ने संकल्प सोडला आहे. 2007 मध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उद्योजकताभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या अमेरिकेतील "नॅशनल फाऊंडेशन फॉर टीचिंग एंटरप्रीनरशिप' (एनएफटीई) या संघटनेच्या सहकार्याने "आय-क्रिएट' हा उपक्रम राबवत आहे। एनएफटीईने जगभरातील जवळपास अडीच लाख तरुणांना प्रशिक्षण दिले असून 5 हजार 700 एंटरप्रीनरशिप टीचर्स तयार केले आहेत.
एनएफटीईने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे "आय-क्रिएट' भारतीय तरुणांना रोजगाराचे धडे देत आहे। भार्गव दांपत्याचा हा आदर्श सर्वच अनिवासी भारतीयांनी बाळगण्याची गरज आहे. असे झाल्यास खेडोपाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल, आणि त्यातून बलशाली भारत उभा राहण्यास मदत होईल.
भार्गव दांपत्याच्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.icreateinc.org या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.