Monday, September 15, 2008

विद्यापीठांची दशा

भारत २०२० सालापर्यंत जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहात आहे. भारतातील तरूण मनुष्यबळाची वाढती संख्या ही आपली सर्वात जमेची जमेची बाजू आहे. पुढील काही वर्षांत भारत हा जगातील सर्वात तरूण देश असेल, असे म्हटले जाते. त्या अनुषंगाने जगात भक्कम स्थान करण्यासाठी आपला देश औद्योगिक, वाणिज्य, परराष्ट्रीय, सुरक्षा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी आसुसलेला आहे. जुनी - बुरसटलेली पद्धत बदलून आधुनिक दृष्टीकोनाचा अंगिकार केला जात आहे. प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना जुनाट संकल्पना, जुनाट विचार आपल्याला मागे खेचत असतात. गेल्या साठ वर्षांत आपल्या देशात राबविण्यात येत असलेली kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थाl ही सुद्धा एक बुरसटलेली पद्धत आहे. विशेषतः राज्यस्तरीय विद्यापीठे ही अत्यंत मागासलेली आहेत. बदलत्या काळानुसार kविद्यापीठीय शिक्षण व्यवस्थेlत महत्त्वाचे बदल करण्यास आपल्याला अपयश आलेले आहे. खरेतर, विद्यापीठ म्हणजे, संलग्न महाविद्यालयांचा कारभार सांभाळणारी एक पर्यवेक्षीय यंत्रणा असा समज पसरला आहे. परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल लावणे एवढ्यापुरतेच विद्यापीठांचे महत्त्व उरले आहे. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला मुंबई व पुणे या विद्यापीठांमध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ही दोन्हीही विद्यापीठे नावाजलेली आहेत. त्यामुळेच या विद्यापीठांच्या पदवीला महत्त्व आहे. मुंबईतील बहुतांशी महाविद्यालयांचा दर्जा इतका खालावलेला आहे की, तेथून बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना आपल्या संबधित अभ्यासक्रमामध्ये पुरेसे ज्ञानही मिळालेले नसते. पण कारण महाविद्यालयातून जाणाऱया विद्यार्थ्याला मुंबई-पुणे विद्यापीठाची पदवी मिळत असते. त्यामुळेच अनेक संस्थाचालक महाविद्यालये थाटून पैसा वसुलीचा धंदा करीत आहेत. अशा संस्था म्हणजे, विद्यापीठांच्या नावाने धंदा करणारी दुकाने बनली आहेत. बरे, अशा महाविद्यालयांवर वचक ठेवण्याची जबाबदारी विद्यापीठाची असली तरी आपल्या कार्यकक्षेतील तब्बल ३०० महाविद्यालयांच्या कारभारावर अंकुश घालणे प्रशासकीयदृष्टया केवळ अशक्य अाहे.
सध्यस्थितीत विद्यापीठे या शेकडो महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामातच अधिक गढलेली दिसत आहेत. वास्तविक, विद्यापीठांची खरी जबाबदारी संशोधन करणे व उच्च दर्जाचे शैक्षणिक कायक्रम राबविणे ही आहे. पण सध्यस्थितीत या दोन्ही कामांशिवाय विद्यापीठे चालविली जातात. संशोधन हा विद्यापीठांचा आत्मा असतो. पण हा आत्मा विद्यापीठात दिसेनासा झाला आहे. वास्तविक, संलग्न महाविद्यालयांच्या जोखडातून मुक्त झाल्या विद्यापीठे मोकळा श्वास घेणार नाहीत. संलग्न महाविद्यालयांमुळे शैक्षणिक दर्जा कमालीचा ढासळत चालला आहे. आपले शिक्षण हे परीक्षा केंद्रीत बनले आहे. विद्यापीठाने बनविलेल्या अभ्यासक्रमाची बाजारात उपलब्ध आयती पुस्तके विकत आणायची. त्याची घोकंपट्टी करायची आणि परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिका भरून काढायच्या. अशा दर्जाचे शिक्षण आपल्या युवकांना दिले जात आहे. संलग्न महाविद्यालयांतून दिल्या जाणाऱया पदवी अभ्यासक्रमाच्या तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. देशामध्ये सध्या काही केंद्रीय विद्यापीठे तसेच काही उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संशोधन व शैक्षणिक कार्यक्रम बऱयापैकी चांगल्या पद्धतीने राबविले जातात. विशेषतः आयआयटीने जगभरात आपला चांगला ठसा उमटवला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेही नावलौकीक संपादन केले आहे. इतर विद्यापीठांची मात्र दशा झाली असून त्यांना दिशा सापडण्याची गरज आहे.