विज्ञान, भाषा, गणित, समाजशास्त्र हे शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे मुख्य विषय मानण्यात येतात. मात्र यातील अनेक विषयांना बगल देत पाककला, पर्यावरण शिक्षण, फॅशन डिझायनिंग, पर्यावरण शास्त्र, शारीरिक शिक्षण, योगा, होम सायन्स असे दुय्यम दर्जाचे विषय घेऊन आयसीएसईचे विद्यार्थी भरघोस गुण मिळवितात. त्यामुळे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू केल्यास मुख्य विषय वगळले जाऊन दुय्यम दर्जाच्या आधारे त्यांची टक्केवारी अधिकच वाढणार आहे. त्यामुळे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू केले तर एसएससीच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होईल. आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू करायचेच असेल, तर दुय्यम विषयांना वगळून केवळ मुख्य विषयांचेच गुण गृहीत धरून लागू करावे, असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले. आयसीएसईच्या बोर्डातून गेल्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या ४० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तसेच विषय निवडीबाबतच्या आयसीएसई बोर्डाच्या नियमांचा अभ्यास केल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली आहे. दुय्यम दर्जाच्या विषयांमुळे मुख्य विषयांच्या तुलनेत आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना सध्या तीन ते सहा टक्के अधिक गुण मिळतात. ‘बेस्ट फाइव्ह’ सूत्र लागू केले तर त्यात अजून तीन ते आठ टक्क्यांची वाढ होईल, असे अभ्यासाअंती आढळून आले.
एसएससीमध्ये तीन भाषा विषय, गणित, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्र असे एकूण सहा विषय शिकविले जातात. हे सर्व मुख्य विषय असून शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण अशा विषयांना केवळ ग्रेड दिल्या जातात. मुख्य विषयांच्या आधारे एसएससीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करून गुण मिळविणे कठीण जाते. याउलट आयसीएसईमध्ये पहिल्या समूहातील इंग्रजी, द्वितीय भाषा, सामाजिक शास्त्र आणि पर्यावरण शिक्षण हे चार विषय अनिवार्य आहेत. दुसऱ्या समूहातील दहा विषयांपैकी कोणतेही दोन विषय घेणे आवश्यक आहे. यात गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, कमर्शियल स्टडीज, टेक्नीकल ड्रॉईंग, आधुनिक परकीय भाषा, पारंपारिक भाषा, कॉम्प्युटर सायन्स, पर्यावरण शास्त्र, कृषी शिक्षण या विषयांचा समावेश आहे. या दोन्ही समूहातील विषयांसाठी लेखी परीक्षा ८० गुणांची व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे आहे. तिसऱ्या समूहात एकूण २० विषय असून त्यातील एक विषय निवडणे अनिवार्य आहे. यात कला, पाककला, परफॉर्मिग आर्टस्, फॅशन डिझायनिंग, योगा, शारीरिक शिक्षण, एन्व्हायरन्मेंटल अॅप्लीकेशन इत्यादी विषयांचा समावेश आहे. या तिसऱ्या समूहातील ५० गुणांची लेखी परीक्षा व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येते. एसएससीच्या तुलनेत हलकेफुलके विषय घेऊन अधिक गुण मिळविणारे आयसीएसईचे विद्यार्थी खरोखरच एसएससीच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सरस असतील का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.